छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीला विविध ठिकाणी नेत तिच्यावर वारंवार अत्याचार करणाऱ्या आणि तिला गर्भवती होण्यास कारणीभूत ठरलेल्या आरोपीला जिल्हा न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली आहे. अक्षय ज्ञानेश्वर इंगळे (वय २६, रा. फुलेनगर, आंबेडकरनगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून, जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.पी. रागीट यांनी सोमवारी (२९ रोजी) त्याला पोक्सो कायद्यांतर्गत २० वर्षांची सक्तमजुरी आणि ३० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. आरोपीला ठोठावलेली दंडाची संपूर्ण रक्कम पीडित मुलीला
नुकसान भरपाई म्हणून देण्याचेही आदेशात स्पष्ट केले आहे.
या प्रकरणी १७ वर्षीय पीडितेने तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, घटनेच्या सुमारे वर्षभरापूर्वी पीडितेची आरोपीशी ओळख होऊन त्याचे रुपांतर प्रेमात झाले. २५ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी साडेदहा वाजता आरोपी इंगळेने पीडितेला घरी बोलावत लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला. त्यानंतर आरोपीने जानेवारी २०२० मध्ये पीडितेवर घरी व ५ फेब्रुवारी २०२० रोजी दुपारी हिमायत बाग येथील तलावाजवळ अत्याचार केला. दरम्यान, २५ फेब्रुवारी २०२० रोजी पीडितेच्या वडिलांचे अर्धांगवायूच्या आजाराने निधन झाले. त्यानंतर पीडिता
ही अमरावती येथील मावशीकडे राहण्यासाठी गेली होती. घरी परतल्यावर पीडितेचे पोट दुखत असल्याने आईने पीडितेला १९ सप्टेंबर २०२० रोजी ईएसआयसी हॉस्पिटलला नेले. तेथे पीडितेची सोनोग्राफी केली असता गर्भवती असल्याचे समोर आले. प्रकरणात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तपास या प्रकरणी अधिकारी तत्कालीन सहायक
निरीक्षक अल्केशा पाटील यांनी न्यायालयात दोषारोपप्रत्र दाखल केले.
खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता अरविंद बागुल यांनी दहा साक्षीदार तपासले. त्यात पीडिता आणि डीएनए अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपी अक्षय इंगळे याला दोषी ठरवून भांदवि कलम ३७६ (२) आणि पोक्सो अंतर्गत २० वर्षे सक्तमजुरी आणि ३० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. प्रकरणात अॅड. बागुल यांना अॅड. मोनाली बागुल यांनी सहकार्य केले. तर पैरवी अधिकारी महिला हवालदार घुगे यांनी काम पाहिले.











